मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी
सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोडसोयगाव मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच इतर सर्व बँकांच्या कर्जवसुलीस दुष्काळी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दुष्काळामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने शेतकरी, महिला बचत गटातील महिला आणि सर्वसामान्य कर्जदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनेकांनी मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच विविध बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.
अशा परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांचे तसेच बँकांचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी जाऊन कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांवर मानसिक व आर्थिक ताण वाढत आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर वसुलीचा दबाव आणणे अन्यायकारक असल्याचे सत्तार यांनी पत्रात नमूद केले आहे.
-- कर्जदारांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये --
दुष्काळी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत कर्जवसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या व सर्व बँकांना देण्यात यावेत. या कालावधीत हप्ते भरता न आल्यामुळे कोणत्याही कर्जदाराचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कर्जवसुलीच्या नावाखाली कर्जदारांना मानसिक त्रास, दबाव किंवा कोणत्याही प्रकारचा जाच केला जाणार नाही, यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुष्काळाच्या कठीण काळात शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा आणि या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.